भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरच असावा, या मागणीसाठी येत्या ३ फेब्रुवारी रोजी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात अधिकाधिक मराठी नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी मिरा-भाईंदर शहरासह आसपासच्या परिसरात समितीने जाहिरात फलक लावले असून, या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता स्थापन करून आपला महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार ३ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीची औपचारिक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा भाजपने दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांना महापौरपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, यामुळे शहरात मराठी-अमराठी वादास तोंड फुटले आहे.
मिरा-भाईंदरसाठी मराठी महापौर द्यावा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने भाजपकडे केली होती. मात्र पक्षाने या मागणीकडे कानाडोळा केल्याने समिती संतप्त झाली असून, शहरात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी रोजीच महापौर निवड प्रक्रिया होत असताना हा मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे.
या मोर्चात अधिकाधिक मराठी भाषिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. त्यासाठी मिरा-भाईंदरसह मुंबई आणि ठाण्यातही जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. ‘हे शहर मराठी भाषिकांचे असून, येथे मराठी महापौरच व्हावा’ असा मजकूर या फलकांवर झळकत आहे. तसेच डिंपल मेहता या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबातील असल्याने त्यांना संधी दिली गेल्याचा आरोप करत, ‘घराणेशाही नाही, तर मराठी शाही शहरात चालेल’ असेही नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना आणि समितीमध्ये वाद
मराठी एकीकरण समितीमुळेच मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ भाजपला झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख हे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘ताटाखालचे मांजर’ असल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तर आपल्यावर झालेल्या आरोपांना झाकण्यासाठीच हे आंदोलन केवळ दिखाव्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
ठाण्यातही झळकले ‘चला मिरा भाईंदरचे’ फलक
मिरा-भाईंदर शहरात पुन्हा एकदा मराठीच्या भाषेच्या अस्तित्वाच्या मुद्द्यावरून आंदोलन पुकारले जाणार आहे. याआधी झालेल्या आंदोलनात ठाणे, वसई – विरार अशा विविध भागातील नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यातही चलो मिरा भाईंदर या आशयाचे फलक झळकले आहेत.

