वसई: मरीन लाइन्स रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ आणि ४ दरम्यान असणाऱ्या पादचारी पुलावर क्रेनच्या सहाय्याने गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी ३० आणि ३१ मे च्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे रात्री आणि पहाटे विरारहून सुटणाऱ्या तसेच चर्चगेटहून विरारसाठी सुटणाऱ्या लोकल गाड्यांवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या विरारकरांचा चांगलाच खोळंबा होऊ शकतो.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी हा ब्लॉक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच ३१ मार्च रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरळीत सुरू असेल, अशी माहितीही पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विरार लोकलवर झालेला परिणाम:

लोकल क्र. VR91018: विरारहून रात्री २३:४९ वाजता चर्चगेटसाठी सुटणारी लोकल फक्त मुंबई सेंट्रलपर्यंतच जाईल. मुंबई सेंट्रल ते चर्चगेट फेरी रद्द करण्यात आली आहे.

लोकल क्र. VR91024: विरारहून मध्यरात्री ००:०५ वाजता सुटणारी लोकल केवळ चर्चगेटपर्यंत न जाता केवळ मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंतच धावेल.

लोकल क्र. VR90011: विरारसाठी चर्चगेटवरून सुटणारी चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रल स्थानकातून पहाटे ०४:२५ वाजता सुटणार आहे.

विरारकरांसाठी पहिली आणि शेवटची लोकल सेवा:

विरारहून चर्चगेटसाठी शेवटची लोकल: ट्रेन क्र. VR91012 विरारहून रात्री २३:३० वाजता सुटेल आणि नेहमीप्रमाणे रात्री ०१:१० वाजता चर्चगेटला पोहोचेल.

चर्चगेटहून सुटणारी पहिली फास्ट लोकल: ब्लॉक संपल्यानंतर चर्चगेटहून विरारसाठी पहिली जलद लोकल ट्रेन क्र. VR90021 पहाटे ०४:४० वाजता सुटेल.