महापलिकेच्या दुर्लक्षामुळे कोटय़वधींचा खर्च वाया, उत्पन्नही बुडीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार :  वसई-विरार महानगरपालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी बाजारपेठय़ा उभारल्या आहेत. परंतु  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्या ओस पडल्या आहेत. या बाजारपेठांसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.  शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढत असून बाजारपेठांत हे फेरीवाले बसत नसल्यामुळे पालिकेचे कोटय़वधीचे उत्पन्नही बुडीत निघाले आहे. पालिकेच्या फेरीवाला धोरणाला मुहूर्त मिळत नाही तर दुसरीकडे  शहरातील फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. फेरीवाले या बाजारपेठांना प्रतिसाद देत नसल्याचे सांगत पालिका आपली बाजू टोलवत आहे.  पालिकेने बोळींज, नवघर माणिकपूर, सोपारा, विरार, चंदनसार, मनवेल पाडा, आणि इतर ठिकाणी येथे भाजी व मासळी अशा २७ बाजारपेठा उभारल्या आहेत. यातून पालिकेला चांगल्या उत्पन्नाबरोबर  नागरिकांनाही एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळतील अशी धारणा होती.  परंतु  आज त्याचा वापर महापालिकेच्या कचरा कुंडय़ा व कचऱ्याच्या गाडय़ा ठेवण्यासाठी केला जात आहे.  काही ठिकाणी  भिकारी, भटके कुत्रे तसेच गर्दुल्ले, मद्यपींचा आसरा बनत आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठा वाहनाच्या पार्किंगसाठी तसेच गाडय़ा दुरुस्ती करणारे दुकानदार आपल्या गाडय़ा ठेवण्यासाठी वापरत आहेत. 

सध्या पालिकेकडे नऊ प्रभाग समित्यांत एक किंवा दोन बाजारपेठा सुरू आहेत. पण त्याही केवळ नावापुरत्या आहेत.  बाकी इतर इमारती वापरत नसल्याने त्यांची डागडुजी केली जात नाही. यामुळे त्या जर्जर झाल्या आहेत. प्रभाग समिती अ  १, ब  १, सी   २, डी   २, ई  २, एफ  २, जी ५, एच १ आणि आय मध्ये ११ बाजारपेठा पालिकेने बांधल्या आहेत. यातील काही  ग्रामपंचायत तथा नगर परिषेदेच्या काळातील आहेत.  या सर्वाचीच दुरवस्था झाली आहे. महापालिकेने बाजारपेठा उभारल्यानंतर विविध ठिकाणी रस्त्यावर बसणारे मासळी  व भाजीपाला विक्रेते यांना भेटून मासळी व भाजीपाला विक्रीसाठी बाजारामध्ये येऊन बसा असे सांगण्यात आले होते. बाजारामध्ये येऊन बसावे यासाठी वारंवार जनजागृतीही केली गेली. परंतु  विक्रेत्यांचा प्रतिसाद लाभला नाही, असे सांगितले जाते.  पालिका या बाजारपेठांच्या  डागडुजीचा विचार करत आहे. लवकरच त्याचे सर्वेक्षण करून दुरुस्ती केली जाईल, असे पालिका उपायुक्त  पंकज पाटील यांनी सांगितले आहे.

उपाययोजना विचाराधीन

नव्याने आलेल्या आयुक्तांनी या बाजारपेठांसंदर्भात नवे धोरण आखले आहे.   काही उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. यात महापालिकेच्या काही सेवा सुरू करणे तसेच काही ठिकाणी प्रदर्शने भरविणे, विरंगुळय़ाचे कार्यक्रम आयोजित करणे. तसेच काही व्यापारी संघटनाच्या मदतीने विशेष सेल लावणे असा विचार केला आहे. यासाठी लवकरच आयुक्तांकडून या बाजारपेठांची पाहणी केली जाईल,  अशी माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets dusty billions wasted income negligence ysh
First published on: 21-01-2022 at 00:02 IST