कारवाईऐवजी वसई-विरार महानगरपालिकेचा अग्निसुरक्षा यंत्रणांबाबत केवळ नोटिसा बजावण्यावर भर असल्याचा आरोप

विरार : ठाणे येथील मंगल कार्यालयात आग लागलेल्या दुर्घटनेने पुन्हा एकदा वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभाग खडबडून जागा झाले आहे. आता नेहमीप्रमाणे मंगल कार्यालयांना अग्नीसुरक्षा लेखा परीक्षण करून घेण्याच्या नोटीस बजावण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. पालिकेने शहरातील सर्वच मंगल कार्यालयांना नोटीस बजावल्या आहेत.

वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाची कार्यप्रणालीबाबत नेहमीच टीका झाली आहे. शहरात दुर्घटना घडल्या असता महानगरपालिका केवळ नोटीस बजावण्याचे काम करत आहे. यापूर्वीही अशी उदाहरणे समोर आली आहेत. एखादी दुर्घटना घडली की पालिका शहरातील आस्थापनांना नोटीस बजावत फिरते. पण या नोटिसा बजावल्यानंतर किती आस्थापनांनी आपल्या आवारात अग्निसुरक्षा यंत्रणा बसविल्या याचे कोणतेही अहवाल मात्र पालिका देत नाही. अहवालावर काम सुरू असल्याचा पाढा वाचला जात आहे. शहरातील हॉटेल, मॉल, शाळा, शिकवणीवर्ग, मंगल कार्यालये, रुग्णालये, मोठी दुकाने, अशा विविध आस्थापनांना पालिका मागील ९ वर्षांपासून केवळ नोटिसा बजावत आहे. त्यांवर कारवाई झाल्याचे अजूनही समोर आले नाही. यामुळे केवळ नोटीसबाज पालिका असल्याचा आरोप केला जात आहे.

ठाण्यातील दुर्घटनेनंतर पालिकेच्या रडारवर आता मंगल कार्यालये आली आहेत. पालिकेने २०० हून अधिक मंगल कार्यालयांना पालिकेने नोटिसा बजावल्या असल्याची माहिती पालिका अग्निशमन विभागाने दिली आहे. तसेच खुल्या मैदानात आयोजित केले जाणारे मंगल सोहळेसुद्धा पालिकेने रडारवर घेतले आहेत. यातील आयोजकांनीही अग्नीसुरक्षात्मक यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी माहिती दिली की, शहरातील सर्वच आस्थापनांना पालिका नोटीस बजावत असून त्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच महानगरपालिका अग्निशमन कर्मचारी या आस्थापांनना भेट देऊन त्याचे अहवाल तयार करत आहेत. शहरातील बहुतांश रुग्णालये पालिकेने पाठपुरावा करून अग्निशमन यंत्रणेखाली आणली आहेत. त्याचप्रमाणे इतर आस्थापनासुद्धा पालिका लवकरच यंत्रणेखाली आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.