वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत वसई फाटा येथे कापड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. एक ते दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कापड कारखाना जळून खाक झाला आहे.

वसई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून आर्टीमाईज आऊटलेट असून त्याच्या वरील भागात कपड्याचा कारखाना आहे. बुधवारी रात्री अचानकपणे या कपडा कारखान्यात भीषण आग लागली होती. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती.

स्थानिकांनी या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली.  माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन जवळपास सहा अग्निबंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले होते. कापड व त्याचे साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती.हवेत आगीचे उंचच उंच लोळ पसरत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी हानी झाली नसून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले असल्याचे अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.  नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण अजूनही समजू शकले नाही.या आगीत कारखान्यातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाला लागूनच ही घटना घडल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती