भाईंदर:-मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा टप्पा सहज ओलांडत पुन्हा एकदा शहरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल ७८ जागांवर विजय मिळवत भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवली असली, तरी महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे. कारण यंदा महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाला. त्यात भाजपने बहुमताचा ४८ चा आकडा पार करत स्पष्ट आघाडी घेतली. त्यामुळे आगामी महापौर भाजपचाच असेल, हे निश्चित झाले असले, तरी आरक्षण सोडत झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. महापौरपदासाठी यापूर्वी ज्या प्रवर्गांचे आरक्षण झाले होते,ती सर्व फेरफार पूर्ण झाले असून आता नव्याने सोडत काढावी लागणार आहे.
यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण लागू झाल्यास महापौरपदासाठी चुरस तीव्र होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विधानसभा प्रमुख रवी व्यास, माजी उपमहापौर हसमुख गहलोत, ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.दरम्यान, राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांनंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अद्याप प्रलंबित आहे. मंत्रालयात येत्या आठवड्याभरात सर्व महापालिकांसाठी एकत्रित सोडत काढली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस मिरा-भाईंदरच्या महापौर खुर्चीवर कोण विराजमान होणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महिलांचा दबदबा:
मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत सहा वेळा महिलांनी महापौरपद भूषवले आहे. त्यामुळे यंदाही महिला आरक्षण लागू होणार का, याकडे विशेष लक्ष लागले आहे. तरुण आणि सुशिक्षित चेहरे मोठ्या संख्येने निवडून आल्याने, यंदा पक्ष नेतृत्वाकडून नवे चेहरे पुढे आणले जातील का, यावरही चर्चा रंगली आहे.
