भाईंदर : तरण तलावात बुडून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या महापालिकेच्या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
भाईंदर येथे महापालिकेचे गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल आहे. काही महिन्यांपूर्वी या संकुलात नऊ वर्षीय ग्रंथ मूथा या मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा अहवाल प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीमार्फत देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर क्रीडा संकुल काही काळ बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी क्रीडा विभागाला दिले होते. त्यानुसार, मागील दीड महिना हे संकुल बंद राहिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील सदस्यांकडून आता केली जात आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे, संकुल सुरू केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे अजून काही काळ संकुल बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने नवी युक्ती वापरली आहे. त्यानुसार संकुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे, दुरुस्तीसाठी आवश्यक ५ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे संकुल काही काळ बंदच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाई का नाही?
क्रीडा संकुलातील तरण तलावात ग्रंथ मूथा या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी, महापालिकेने अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने गेल्या महिन्यात आपला अहवाल आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दिला. या अहवालात क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच, पुरेसे आणि प्रशिक्षित प्रशिक्षक नसल्यामुळे मुलाला वाचवता न आल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनेला आता महिनाभराचा कालावधी उलटून गेला असतानाही महापालिका प्रशासनाने कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
तीन वर्षांत पुन्हा दुरुस्ती
मिरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलावर तीन वर्षांपूर्वीच मोठा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर हे संकुल चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, अलीकडील घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“क्रीडा संकुलात काही दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे.त्यामुळे याबाबत ५ कोटी चा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.” – आर. बी.पांगल – कनिष्ठ अभियंता ( सार्वजनिक बांधकाम विभाग)