भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना निधीच्या कमतरतेमुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून अनुदान मिळेपर्यंत किंवा पर्यायी आर्थिक मार्ग निघेपर्यंत या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
मिरा भाईंदर शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. त्यानुसार आतापर्यंत अनेक ठिकाणी अशा रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र उर्वरित रस्त्यांची उभारणी करण्यासाठी पालिकेकडे निधीची कमतरता भासत आहे. हे काम कर्ज घेऊन पूर्ण करण्याचा प्रशासकीय स्तरावर प्रस्ताव आहे; परंतु सध्याची पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे या कामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी स्वीकारावी, अशी मागणी पालिकेकडून करण्यात आली होती.
यानुसार एमएमआरडीएमार्फत काही रस्त्यांची कामे सुरूही करण्यात आली. मात्र उर्वरित अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने ती खाजगी बँकेकडून तब्बल ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पूर्ण करण्याचा निर्णय २०२२ साली प्रशासकीय राजवटीत घेण्यात आला होता. कर्जाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कर्ज मंजूर नसताना, म्हणजेच निधी उपलब्ध नसताना, निविदा प्रक्रिया राबवून काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली.
अद्यापही संबंधित कामांसाठी कर्जाची रक्कम प्राप्त झालेली नाही. दरम्यान अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली तरी त्यांची देयके भागवण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत निधी उपलब्ध नाही. सुमारे दोनशे कोटी रुपयांची देणी थकीत असल्याने ती कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.परिणामी उर्वरित कामे करण्यास कंत्राटदारांकडूनही नकार दिला जात आहे. तसेच इतर कामांची देणीही निधीअभावी प्रलंबित असल्याने थकीत देणींचा डोंगर वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करून नवीन कामे हाती न घेण्याचा निर्णय भाजपकडून नुकत्याच झालेल्या महासभेत ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.

