वसई- नालासोपारा शहर हे अमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे. तुळींज पोलिसांनी बुधवारी रात्री एका नायजेरियन इसमाकडून तब्बल २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मागील महिन्यात देखील तुळींज पोलिसांनी नायजेरियन महिलेकडून २ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. हे नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय आहेत. सातत्याने कारवाई करूनही त्यावर अंकुश घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. बुधवारी रात्री तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर येथे राहणार्या ॲनीबुनवा एल्विस (४४) या नायजेरियन व्यक्तीला हटकले. मात्र तो बॅग टाकून पसार झाला. त्याच्या बॅगेत अकराशे ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ आढळले. त्याची किंमत २ कोटी २० लाख ७१ हजार एवढी आहे. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५(एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क) सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा >>> वसई विरारमध्ये तब्बल २१ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, ८६ कोटी रुपये थकवल्याने महावितरणची कारवाई यापूर्वीच्या अमली पदार्थ कारवाईच्या घटना १२ ऑगस्ट २०२४ : २ कोटींचे अमली पदार्थ जप्त नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील एसपी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी या महिलेकडे सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ आढळून आले. एडिका जोसेफ (३०) असे या महिलेचे नाव असून ती मूळची नायजेरियन देशाची नागरिक आहे. तिच्या व्हिजा ची मुदत संपली होती आणि ती भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहत होती. हेही वाचा >>> महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या १२ एप्रिल २०२४ : ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये तुळींज पोलिसांनी छापा टाकून इझे आना (४४) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडे तब्बल ५७ लाखांचे कोकेने आणि मेफोड्रोन हे अमली पदार्थ आढळून आले. २२ जुलै २०२४ : दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त अमली पदार्थ विरोधी शाखेने सऊद सिराज सैय्यद (३७) सबरिना नुझुंबी (३४) या सापळा लावून अटक केली होती. सऊद कडे ५०४.१ तर सबरिनाकडे ५०५.४ ग्रॅम मॅफेड्रॉन हे अमली पदार्थ सापडले. त्याची किमंत २ कोटींहून अधिक आहे सबरिना नुझुंबी ही महिला मूळ टांझानिया देशाची नागरिक असून नालासोपार्याच्या प्रगतीनगर मध्ये ती बेकायदेशीररित्या रहात होती.