भाईंदर :- मिरा रोड येथे मेट्रोच्या कामादरम्यान कोणतीही सुरक्षा पाळली जात नसल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अंगावर आगीच्या ठिणग्या पडत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मिरा रोड येथील काशिगाव मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे स्थानक प्रवाशांसाठी खुले केले जाणार असून काशिगाव ते दहिसरदरम्यान मेट्रो धावणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून स्थानकाच्या लोकार्पण कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. तत्पूर्वी मेट्रो कंत्राटदाराला शिल्लक राहिलेले काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने या कामासाठी अतिरिक्त मजूर नेमले आहेत.

मात्र हे काम करताना कोणतीही सुरक्षा बाळगली जात नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. स्थानकावर वेल्डिंगचे काम सुरू असताना त्यातून निघणाऱ्या आगीच्या ठिणग्या थेट खाली रस्त्यावर पडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याच वेळी खालून प्रवासी व वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या घटनेची चित्रफीत एका जागरूक नागरिकाने समाजमाध्यमांवर टाकून तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याआधीही मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने मजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी माहिती घेऊन काही चूक आढळल्यास कंत्राटदाराला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले जातील, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

जिन्याचे कामही सुरू :-

काशिगाव मेट्रो स्थानकाच्या उभारणीदरम्यान खाजगी जमिनीत जिना उतरत असल्याने आमदार नरेंद्र मेहता यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. या जागेसाठी योग्य मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे जिन्याचे काम काही काळ थांबवण्यात आले होते आणि मेट्रो प्रकल्पाला विलंब झाला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या काम प्रगतीपथावर सुरू असल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.