भाईंदर: शहरात सुरू होत असलेल्या विविध मेट्रो प्रकल्पांमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या संधींमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने शासनाकडे केली आहे.

मुंबई व उपनगरांत मेट्रोचे विस्तृत जाळे पसरत असून, यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. काही मेट्रो सेवा सुरू करण्यात आल्या असून इतरांचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे भविष्यात मेट्रोच्या तांत्रिक कामांसह स्थानकांवरील इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोमध्ये मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे.

यासाठी लवकरच समिती एमएमआरडीए प्राधिकरणाची भेट घेणार आहे. तसेच, मेट्रोमध्ये स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देण्याबाबत धोरण निश्चित करावे आणि सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकांमध्ये किती मराठी तरुणांना रोजगार मिळाला आहे, याची सविस्तर माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित मेट्रो कंत्राटदारांची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

स्थानकांवर मराठी पाट्या लावा

मेट्रो मार्गिकांसाठी विशिष्ट अंतरावर मोठी स्थानके उभारली जात आहेत. या स्थानकांवर विविध सूचना फलक लावण्यात आले आहेत. भविष्यात येथे व्यावसायिक आस्थापनाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानकांवर सक्तीने मराठी भाषेतील पाट्या लावण्याचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.