भाईंदर :- दहिसर मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गावरील पांडुरंगवाडी या प्रस्तावित स्थानकाचे नाव बदलून पेणकरपाडा गाव’असे ठेवावे, अशी ठाम मागणी स्थानिक ग्रामस्थांनी एमएमआरडीएकडे पत्राद्वारे केली आहे.यामुळे नव्या वादास तोंड फुटले आहे.

दहिसर पथकर नाका ओलांडताच उभारण्यात आलेले मेट्रो स्थानक हे पेणकरपाडा गावा लगत उभे आहे.मात्र असे असताना सुमारे ८०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या ‘पांडुरंगवाडी’ परिसराचे नाव देण्यात आल्यामुळे स्थानकाच्या नावात विसंगती निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांची दिशाभूल होऊन गैरसोय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असून, त्यापूर्वीच ही चूक दुरुस्त करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे. ‘पांडुरंगवाडी’ या नावाला आमचा विरोध नाही. मात्र ज्या ठिकाणी स्थानक प्रत्यक्षात उभे आहे, त्या ठिकाणाच्या नावानेच ते ओळखले जावे, हीच आमची भूमिका आहे, असेही ग्रामस्थांनी शासनाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तर या मागणीसाठी ग्रामस्थांनी एमएमआरडीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन पाठवले असून, लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.