वसई: वसई खाडीवरील वर्सोवा पुलावर सध्या हिवाळी पक्ष्यांची रेलचेल पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो मैलांचा प्रवास करून आलेले कुरव (सीगल) पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
वसईतील हिरवागार निसर्ग आणि शहरीकरणाच्या रेट्यात टिकून असणाऱ्या पाणथळ जागा यामुळे हिवाळ्याची चाहूल लागताच युरोप खंड आणि उत्तर आशियातून विविध प्रजातीचे पक्षी कोकण किनारपट्टी आणि खाडी परिसरात स्थानांतर करत असतात. वसईच्या किनारपट्टी परिसरात हिवाळी हंगामात आढळून येणारी पक्ष्यांची अशीच एक प्रजाती म्हणजे कुरव (सीगल).
वसईत स्थानांतर करून येणाऱ्या कुरव पक्ष्यांमध्ये मुख्यत्वे काळ्या डोक्याचा कुरव (ब्लॅक हेडेड सीगल) आणि तपकिरी डोक्याचा कुरव (ब्राऊन हेडेड सीगल) या दोन प्रजाती आढळून येतात. दोनही प्रजाती दिसायला खुप सारख्या आहेत. पण, नीट निरिक्षण केल्यास त्यांचा आकार, डोळ्यांचे रंग, उडताना दिसणाऱ्या पंखावर असलेल्या रंगसंगती यामुळे त्याच्यातला फरक सहज कळून येतो. काळ्या डोक्याचा कुरव हे युरोप, रशिया, चीन या भागांतून तर तपकिरी डोक्याचा कुरव दक्षिण-मध्य आशियातील लडाख, तिबेट, पश्चिम चीन यांसारख्या उंच पर्वत रांगाकडून वसई विरारमध्ये येतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक रमेश शेणाई यांनी दिली आहे.
या पक्ष्यांच्या आकारावरुनही त्यांची स्थानांतराची ठिकाणे ठरतात. मोठे कुरव हे मुख्यत्वे समुद्रकिनारी आढळून येतात. तर लहान आकाराचे कुरव हे समुद्रकिनारी, खाडी परिसरात तसेच पांथळ जागांच्या ठिकाणी आढळून येतात.
वर्सोवा पूल हा वसई खाडीवर असल्याने या भागात माशांची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या पक्ष्यांनी वर्सोवा पूल परिसरात मुक्काम ठोकला आहे. आकाशात उंचचउंच झेपावणारे आणि खाडीच्या पाण्यात सूर मारणारे पक्षी पाहण्यासाठी अगदी पहाटेपासूनच पर्यटकांची पावले पुलाकडे वळू लागली आहेत.
पक्ष्यांना खाऊ घालणे धोक्याचे
मासे किंवा किटक खातात हा कुरव पक्ष्यांचा मुख्य आहार आहे. पण, अनेक पर्यटक त्यांना फरसाण, शेव यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ घालतात. पण, हे खाद्य पक्ष्यांच्या आहाराचा भाग नसल्यामुळे त्यांना आवश्यक असलेली सत्व मिळत नाहीत आणि त्यामुळे पक्ष्यांना हानी पोहोचते. तसेच अशा पदार्थांच्या सेवनामुळे पक्ष्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
पाणथळ जागांवरील बांधकामामुळे स्थानांतर घटले
वसई विरार शहरात सध्या विविध ठिकाणी खाजगी तसेच सरकारी प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. यापैकी काही प्रकल्प हे पाणथळ जागांवर उभारण्यात आले. त्यामुळे वाढत्या नागरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या पाणथळ जागा फार कमी उरल्या आहेत. त्यामुळे तुलनेने कुरव या पक्ष्यासह इतर स्थानांतरित पक्ष्यांचे वसई विरार शहरात होणारे आगमन संपुष्टात आले आहे. तर काही पक्ष्यांच्या आगमनाचा कालावधी लांबला असल्याचे, पक्षी अभ्यासक रमेश शेणाई यांनी सांगितले आहे.

