वसई: साखर आणि त्यापाठोपाठ अचानक वाढलेल्या दुधाच्या दरामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर या दोन्ही दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरात केलेली वाढ कृत्रिम असून याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नवघर बस आगारात सोमवारी धरणे आंदोलन केले.
सणासुदीचा काळ सुरू झाला असताना साखर आणि दुधाच्या दराने उच्चांकी दर गाठले आहेत. गेल्या आठवड्यात साखर ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. तर प्रतिलिटर दुधाच्या दरात ९ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असताना सोमवारी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नवघर बस आगारात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसुझा, प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, काँग्रेस नेते ओनील अल्मेडा, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना, भाजपा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेला आर्थिक सुनामीचा सामना करावा लागेल. महागाई शिगेला पोहचेल व जनता त्यात पिळून जाईल हे सत्य आता समोर येत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेवर एकट्या साखरेमुळे १८ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे या खर्चातून भाजप सरकारने जनतेला सवलत द्यायला हवी आणि सवलत न दिल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला.
