वसई: वसई पूर्वेच्या तिल्हेर भागात दगड उत्खनन करण्यासाठी खदाणीत स्फोट घडवून आणले जात आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसराला हादरे बसू लागले आहेत.याशिवाय नागरिकांच्या राहत्या घरांना तडे जाऊ लागल्याने धोका निर्माण झाला आहे.
वसई पूर्वेच्या तिल्हेर परिसर आहे. या भागात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती आहे. याच भागात दगड उत्खनन करण्यासाठीच्या दगड खाणी व क्रश मशीन उभारण्यात आल्या आहेत. या खाणीतील दगड काढण्यासाठी या भागात स्फोटके लावली जात आहेत. काही स्फोटकांची तीव्रता अधिक असल्याने त्याचे हादरे हे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीला बसू लागले आहे. विशेषत: बोअर स्फोटकांची तीव्रता अधिक असून या स्फोटांमुळे या भागातील नागरिकांची घरे, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर यांना तडे जाऊ लागले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे येथील घरांचे मोठे नुकसान होत असून काही घरे मोडकळीस येऊ लागली आहेत. ही घरे कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नुकताच या सावित्रीफुले महिला संघटना व क्रांतिकारी मार्क्सलवादी पक्ष यांच्या तर्फे तिल्हेर दगड खदाणी वर मोर्चा काढण्यात आला होता यात शेकडो महिलांसह इतर नागरिक यात सहभागी झाले होते. यावेळी दगड खदाणी बंद करा, क्रशरमुळे बाधित होणारम्य़ांना नुकसान भरपाई द्य अशा विविध मागण्या येथील नागरिकांनी केल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये एक तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही प्रशासनाला येथील नागरिकांनी दिला आहे.
प्रदूषणामुळे शेतीपिके, फळझाडांचे नुकसान
दगड क्रशर करणाऱ्या यंत्राद्वारे मोठय़ा प्रमाणात भुकटी बाहेर पडत असून त्याचे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण पसरू लागले आहे. यामुळे येथील शेती पिके, फळझाडे यांचे ही नुकसान होत आहे. तर गुरांना चरण्यासाठी लागणारा चारा ही यामुळे नष्ट होऊ लागला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र अजूनही यावर कोणताच तोडगा काढला जात नसल्याने येथील नागरिकांना धोकादायक रित्या राहावे लागत असल्याचे क्रांतिकारी मार्क्सोवादी पक्षाचे विष्णु पाडवी यांनी सांगितले आहे.
दगड खाणीत अधिक तीव्रतेची स्फोटके लावली जात आहेत. याचे हादरे हे परिसराला बसत आहेत. अनेकांच्या घरांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आता तरी शासनाने स्फोटकांमुळे मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता आमच्या नागरिकांचा प्रश्न सोडवावा.– विष्णु पाडवी, तालुका सचिव क्रांतिकारी मार्क्सनवादी पक्ष