scorecardresearch

मीरा-भाईंदर पालिकेच्या शाळेत शिक्षणमंत्री

राज्यातील शासकीय शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता पहिली व दुसरी इयत्तेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केले.

भाईंदर : राज्यातील शासकीय शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता पहिली व दुसरी इयत्तेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केले. आदर्श शाळा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या मानसिक समस्या दूर करण्याकरिता प्रत्येक शाळेत स्वतंत्र समिती गठित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात आदर्श शाळा योजना सुरू करण्यात आली आहे. यात राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये २१ व्या शतकात टिकून राहण्यासाठी कौशल्ये विकसित व्हावीत, पाठय़पुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाप्रति समाज सक्रिय व्हावा, सरकारी शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढावा, पटसंख्या वाढावी हा हेतू आहे. यासाठी राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणाअंतर्गत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात निवडलेल्या ४८८ शाळांसाठी ४९४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेच्या शुभारंभासाठी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळा क्रमांक ४ व ५ या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळेत आल्या होत्या. आदर्श शाळा योजनेअंतर्गत डोळे तपासणी, मासिक पाळी मार्गदर्शन आणि वैद्यकीय तपासणी आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करून त्यात इंग्रजी भाषेचा जोडभाषा म्हणून समावेश करण्यात येणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून करोना स्थितीमुळे लहान मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मुले मानसिक तणावाचा सामना करत आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत आरोग्य व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन, आंगणवाडीसेविका आणि सामाजिक संस्थेच्या अशा सर्वाच्या मदतीने एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केले. तसेच त्यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवड झालेल्या आदर्श शाळेला तीन कोटी रुपये मंजूर केले. या कार्यक्रमासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आमदार गीता जैन, राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक एम डी सिंह आणि पालिका आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minister education mira bhayander municipal school students teachers parents study education ysh