भाईंदर -उन्हाळ्याच्या सुट्टीत शहरातील नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेने पुन्हा एकदा ‘रविवार उद्यान’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या विविध उद्यानांना भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या नागरिकांचे मनोरंजन व्हावे, त्यांना एक सामाजिक आधार मिळावा, या हेतूने ‘संडे गार्डन’ (रविवार उद्यान) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. मागील दिवाळीच्या सुट्टीत याचा पहिला प्रयोग करण्यात आला होता आणि तो यशस्वी ठरल्याने यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्येही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे यंदा या उपक्रमामध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांचाच नव्हे तर लहान मुलांचाही समावेश करण्यात येत असून, त्यांच्या आनंदासाठीही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
त्यानुसार नुकतेच रविवारी मिरा रोड येथील सावित्रीबाई फुले उद्यानात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संगीत, नृत्य तसेच जादूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि उपायुक्त कल्पना पिंपळे यांनीही अखेरपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.
भाईंदर पश्चिमेतील सालासर उद्यान, रामदेव पार्कमधील सावित्रीबाई फुले उद्यान आणि जेसल पार्क चौपाटी येथे दर रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांत महापालिकेकडून संगीत, खेळ तसेच इतर करमणुकीच्या सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.