भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मिरा रोड येथील देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या डालमिया व्यवस्थापन महाविद्यालयाची नियुक्ती करण्यात आली असून, अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.मागील काही वर्षांत मिरा-भाईंदर शहरातील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली असून, त्यात हवा प्रदूषणाचा सर्वाधिक वाटा आहे.

यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि दम्याचे त्रास वाढताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुमारे १२७ इतका नोंदवण्यात आला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती.या पार्श्वभूमीवर आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी शहरातील हवा प्रदूषणास कारणीभूत घटकांचा सखोल अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

डालमिया व्यवस्थापन महाविद्यालयातील तज्ज्ञ अभ्यासक शहरातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या स्रोतांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करणार आहेत. या अहवालाच्या आधारे भविष्यात हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस धोरण ठरवले जाणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी दिली.

प्रदूषणाबाबत माहिती पुस्तिका प्रसिद्ध होणार

मिरा-भाईंदर शहरात हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची आणि विशेषतः जास्त प्रदूषित भागांची माहिती देणारी पुस्तिका महापालिकेतर्फे प्रसिद्ध केली जाणार आहे. या पुस्तिकेत प्रदूषण कसे कमी करता येईल, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी आणि प्रशासन कोणती पावले उचलणार आहे याची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.