भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्या दोन्ही सख्या भावांवर अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि छळप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी रविवारी त्यांच्या प्रभागात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पीडित मुलगी पाचवीत शिकत असताना तिच्या घराजवळील पालिका शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जयाराम चव्हाण याने शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे चित्रीकरण करून त्याच व्हिडीओच्या आधारे त्याने वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर जयारामचा भाऊ राजेश चव्हाण यानेही पीडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
सततच्या छळामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या पीडितेने अखेर काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून राजेश चव्हाण याला अटक केली आहे. दरम्यान, दुसऱ्या आरोपीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. या प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे. मात्र, पीडित मुलगी मदतीसाठी पूर्वीपासून त्यांच्याकडे संपर्क साधत होती आणि तिला मदत करण्यात आली नाही, असे आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.मात्र याबाबत भाजप कडून अदयापही कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
