भाईंदर :-अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मिरा-भाईंदर मध्ये समोर आला आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी मिरा-भाईंदर पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्या भाऊ राजेश चव्हाणला शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे.
मिरा रोड परिसरात पीडित अल्पवयीन मुलगी रहायला होती. तिच्याशी ५० वर्षीय राजेशने जवळीक निर्माण करून तिला दहिसर येथे भेटण्यास बोलवले होते. यावेळी तिला स्वतःच्या कारमध्ये बसून बळजबरी करण्यात आली. त्यानंतर तिला सिगारेट पासून गोराई येथील एका हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीने अत्याचार करण्यात आले.
त्यानंतर तिला राजेश ने जबर मारहाण देखील केली. यानंतर पीडितेच्या आईला देखील राजेश कडून वारंवार मारण्याचे धमकावले जात होते. याला कंटाळून अखेर शुक्रवारी पिडीतेने काशिमिरा पोलिस ठाण्यात राजेश विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी पोस्कोसह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली आहे. यापूर्वी वीज चोरीच्या प्रकरणात देखील राजेश विरोधात गुन्हा दाखल आहे. एका पत्रकारावर हल्ला केल्याने देखील त्याला अटक करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच राजेश यांचे अनिता पाटील यांच्या जावयाकडून बळजबरीने टक्कल केले जात असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. शहरातील महिला व बालकांच्या कल्याणाची जबाबदारी असणाऱ्या सभापतींच्या भावाकडूनच हे कृत्य करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
” या संदर्भात मला काही माहिती नाही.मात्र जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल तर तो व्यक्ति कोणीही असो त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. उलट अशा अशा कृत्यावर कारवाई साठी मी स्वतः पाठपुरावा करिन. “-अनिता पाटील – महिला बाल कल्याण समिती सभापती
