भाईंदर :- मिरा रोड येथील भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाबाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी महापौर डिंपल मेहता यांची गाडी उभी असतानाही वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे.
मिरा रोड येथील बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ मिरा-भाईंदर भाजपचे तीन मजली पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे. साधारण सहा महिन्यांपासून या कार्यालयाचा वापर सुरू असून पक्षाचे बहुतांश कामकाज याच ठिकाणाहून चालते. त्यामुळे महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी नियमित वर्दळ असते.
मात्र, पक्ष कार्यालयाबाहेरील रस्ता अरुंद असून एका बाजूला मोठा नाला आहे. कार्यालयात येणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाल्याच्या बाजूला चारचाकी तसेच दुचाकी वाहने उभी करतात. नाल्यावर जागा असली तरी वाहने रस्त्याच्या दिशेने आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होते. परिणामी एका वेळी केवळ एक वाहन जाण्याइतकीच जागा उरते. पादचाऱ्यांनाही या ठिकाणाहून चालताना अडचणींचा सामना करावा लागतो.
नुकतेच महापौर डिंपल मेहता यांची गाडी या ठिकाणी उभी असताना वाहतूक कोंडी झाल्याचे छायाचित्र समोर आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात असताना महापौरांच्या वाहनामुळेच कोंडी होत असल्याचा प्रकार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, वाहनांची योग्य पद्धतीने पार्किंग करून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा ठेवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत कार्यालयाच्या खाली तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने महापौरांची गाडी रस्ता सोडून वाहतूक पोलिसांनी आखलेल्या पांढऱ्या पट्टीच्या मागे उभी केली जात असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी वाहने रस्त्याच्या मध्ये उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
