भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय काळात महानगरपालिकेच्या विविध वास्तू आणि विकसित आरक्षित भूखंडांवरील नामफलकांवर लावण्यात आलेली मंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांची छायाचित्रे हटविण्याचा प्रस्ताव आगामी महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. भाजपकडे एकहाती बहुमत असल्याने हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वास्तू व सार्वजनिक मालमत्तांवरील नामफलकांवर मंत्री किंवा लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावण्याची पूर्वी परंपरा नव्हती. प्रशासकीय काळात नियम व राजशिष्टाचाराचे उल्लंघन करून ही छायाचित्रे लावण्यात आल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला असून, ती ‘सन्मानपूर्वक’ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासकीय काळात सरनाईक यांच्या प्रयत्नांतून तसेच नगरविकास विभागाच्या निधीतून शहरातील विविध आरक्षित भूखंड विकसित करण्यात आले होते. या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी शिंदे आणि सरनाईक यांची नावे व छायाचित्रे नामफलकांवर लावण्यात आली होती.आता भाजप सत्तेत आल्यानंतर हा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला आहे. पालिकेत ९५ पैकी ७८ नगरसेवक हे भाजपचे असून एकहाती सत्ता आहे.त्यामुळे १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत हा ठराव बहुमताने मंजूर होणार असल्याने येत्या काळात भाजप शिवसेना वाद तीव्र होण्याची शक्यता आहे.

इतर निर्णयही बदलण्याचा ठराव

मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे.स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता व शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्ये वाद सुरु आहे. त्यामुळे प्रशासकीय कालावधीत सरनाईक यांनी घेतलेले बहुतांश निर्णय बदलण्याचा निर्णय मेहता यांनी घेतला आहे. यात ठाणे घोडबंदर रस्ता पुन्हा शासनाकडे देणे,मंजुर कामे रद्द करणे, विविध कामाची चौकशी करणे आणि समाज भवनावर रोख आणण्याचा यात समावेश आहे.