भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदाने उपलब्ध करून न देण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने महापालिकेत मंजूर केला आहे. त्याचे पडसाद आता नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून उमटू लागले आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवासाठी मैदान देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याने भाजप-शिवसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मात्र, ठराव मंजूर होण्याच्या एक दिवस आधीच मैदानाची परवानगी घेतल्याने यंदाचा उत्सव होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या माध्यमातून विविध सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. बाळासाहेब ठाकरे मैदान आणि मेजर ध्यानचंद मैदान ही त्यासाठी महत्त्वाची ठिकाणे मानली जातात. या मैदानांवर नागरिकांसाठी मोफत आर्ट फेस्टिव्हल, कोकणी महोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.मात्र, या मैदानांवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करणारा ठराव सत्ताधारी भाजपने ऑगस्टमध्ये मंजूर केला. मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवासाठी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मैदानाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मैदाने उपलब्ध करून न देण्याचा ठराव झाल्याचे कारण देत महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी नाकारली. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी ऐनवेळी मिरा रोड येथील नामदार गोखले मैदानाची निवड करण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या निर्णयावर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय विरोधातून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांसाठी मोफत आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना अडथळे निर्माण केल्याने नागरिकांचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपच्या निर्णयाची पूर्वकल्पना असल्याने ठराव मंजूर होण्याच्या एक दिवस आधीच मैदानाची परवानगी घेतली होती, असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, मैदानांवर कार्यक्रमांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने हा निर्णय घेतल्याची भूमिका सत्ताधारी पक्षाने मांडली जात आहे.
मैदानासाठी १४ लाख रुपये शुल्क
मिरा-भाईंदर महापालिकेने मैदाने आणि अन्य मालमत्ता भाड्याने देण्याचे दर वाढविल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांवरील आर्थिक भार वाढला आहे. नवरात्रोत्सवासाठी नामदार गोखले मैदान भाड्याने घेताना संस्कृती युवा प्रतिष्ठानला महापालिकेकडे सुमारे १४ लाख रुपये शुल्क भरावे लागले. यापूर्वी हे शुल्क निम्म्याच्या आसपास होते, असा दावा सरनाईक यांनी केला. इतके जास्त शुल्क आकारल्यास शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे कठीण होईल आणि त्याचा फटका नागरिकांना बसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
