भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील पाणीटंचाईचा फायदा घेऊन बोअरवेलमधून पाणी विक्री करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. खासगी जागेतील बोअरवेल बंद करण्याचे, तर शासकीय जागेवरील बोअरवेल नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मिरा भाईंदर शहरात शासकीय आणि खासगी मिळून एकूण ६६ बोअरवेल आहेत. पाणीटंचाईचा फायदा घेऊन काही जण या बोअरवेलमधून पाणी उपसून त्याची विक्री करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने करण्यात येत आहेत.याप्रकरणी यापूर्वी काही जणांविरोधात अप्पर तहसीलदार विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, कारवाईचे ठोस अधिकार नसल्यामुळे हा प्रकार पुन्हा सुरू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मिरा भाईंदर महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील बोअरवेलमधून होणारी पाणीउपसा आणि त्याची विक्री या विषयावर चर्चा करण्यात आली. खासगी जागेतील बोअरवेल बंद करण्याचे आदेश सरनाईक यांनी तहसीलदार निलेश गौड आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिले. तर शासकीय जागेवरील बोअरवेलजवळ हातपंप उभारून त्याद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात एकीकडे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत बोअरवेलच्या पाण्याची विक्री करून नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“मिरा भाईंदर शहरातील शासकीय बोरवेल जवळच लवकरच हातपंप उभारून ते पाणी नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.तर बेकायदेशीर खाजगी पाणी विक्रेते आणि बोअरवेल धारकांवर कारवाई केली जाणार आहे.” – प्रताप सरनाईक – परिवहन मंत्री