भाईंदर:-मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात उघड्यावर शौचासन (संडासचे भांडे) बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारावरून वाद निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने या भांड्याभोवती तात्पुरते दरवाजे बसवले आहेत.

भाईंदर पूर्व येथील आरएमबी पार्क परिसरातील महापालिकेच्या शौचालयात चक्क बाजूबाजूला शौचासन (संडासचे भांडे) बसवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे उघड्यावरच बाजूबाजूला बसून याचा वापर करायचा का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. याबाबत काही नागरिकांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ व फोटो पोस्ट केल्यामुळे हा मुद्दा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. तसेच प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

सुरुवातीला २ ते ६ वयोगटातील मुलांसाठी हे शौचालय उभारले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रकरण हळूहळू अधिकच चिघळू लागल्यामुळे आता या भांड्याभोवती तात्पुरते फायबरचे दरवाजे बसवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पुन्हा या शौचालयाला भेट देऊन समाधान व्यक्त करत आहेत.

वेगळा वाद समोर

सदर शौचालयाच्या रचनेवरून वाद सुरू असतानाच आता महिला व पुरुष शौचालय एकत्र असल्याचा नवा आरोप मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महिला व पुरुष शौचालये वेगवेगळी करावीत किंवा त्यामध्ये स्पष्ट विभागणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.