भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांची शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या संदर्भात शासनाकडे पत्र देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

मिरा भाईंदर शहरात प्रशासकीय कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अवघ्या ४० कोटी रुपयांच्या आत उभारणी खर्च अपेक्षित असताना बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या उभारणीसाठी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मेहता यांनी मागणी केल्यानंतर सरनाईक यांनी या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून घेणार असल्याचे जाहीर केले.याबरोबरच प्रमोद महाजन कलादालन, सिमेंटचे रस्ते, विकासकांना दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवानग्या तसेच इतर गैरप्रकारांचीही चौकशी करण्याची मागणी शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रसिद्ध करून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील टोकाचे मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.