भाईंदर : मिरा रोड येथील नयानगर परिसरात बहुतांश ठिकाणी नाल्यावरील झाकणे गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अलीकडेच स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील शहरांचे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेच्या आधारे मूल्यांकन केले गेले. २०२४-२५ च्या या स्पर्धेत पाच हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. या वेळी ३ लाख ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिरा भाईंदर देशात अव्वल असल्याचे घोषित करण्यात आले होते. तसेच महापालिकेला ‘५ स्टार कचरामुक्त शहर’ व ‘वॉटर प्लस’ हे प्रतिष्ठेचे मानांकनही प्राप्त झाले होते.
पण, स्वच्छता पुरस्कार प्राप्त झालेल्या मिरा भाईंदर शहरातून सातत्याने साचलेला कचरा, सांडपाणी, उघडी गटारं अशा विविध समस्यांनी लोक त्रस्त होत असल्याची बाब समोर आली आहे. मिरारोड मधूनही असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे.
मिरारोड येथील नयानगर हा उचभ्रू गृहसंकुलांचा परिसर आहे. येथे चित्रपटगृह, रुग्णालय तसेच पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. परिणामी या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. तसेच याच परिसरात महापालिकेची आणि खासगी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत येथे बहुतांश नाल्यावरील झाकणे गायब झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे कोणत्याही क्षणी नागरिक अथवा विद्यार्थी नाल्यात पडून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. काही स्थानिक नागरिकांनी लाकडी फळ्या किंवा इतर साहित्य लावून ही झाकणे झाकण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.तीन महिन्यांपूर्वीच शहरातील नाल्यावरील झाकणे बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही शहरातील अनेक भागांत नाल्यावरील झाकणे बसवण्यात आलेली नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
आगामी दोन महिन्यांत मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत इच्छुक असलेल्या माजी तसेच भावी उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्ष प्रभागातील समस्यांकडे त्यांचे लक्ष नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
