भाईंदर : श्रीकृष्णाच्या माखन चोरीच्या लीलांचे स्मरण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मिरा-भाईंदर शहर सज्ज झाले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या वतीने मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा लाखो रुपयांच्या बक्षिसांमुळे या दहीहंडी उत्सवांकडे गोविंदा पथकांचे लक्ष लागले आहे.
भाईंदर पश्चिमेतील बावन जिनालय जैन मंदिराजवळ ६० फूट रस्त्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वतीने ७ लाख ७७ हजार ७११ रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. त्याच परिसरातील नगर भवनाजवळ मनसेचे उपशहर प्रमुख अभिनंदन चव्हाण यांच्या वतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी होणार आहे.मिरा रोड येथील सेंटर प्लाझा हॉलजवळ (शांती पार्क) प्रताप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शिवसेना समन्वयक विक्रम प्रताप सिंह यांच्या वतीने ३० लाख रुपयांहून अधिक बक्षिसांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.
नऊ थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.मिरा रोड येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ काँग्रेस नेते संदीप पांडे यांच्या वतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आगरी-कोळी गीतांवर गौतमी पाटील यांचा नृत्याविष्कार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेच्या वतीने भाईंदर पूर्वेतील नवघर मैदानावर ५० लाख रुपयांहून अधिक बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकासाठी पहिल्या क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमात लावणी कलावंत गौतमी पाटील आगरी-कोळी गीतांवर नृत्य सादर करणार आहेत.
