भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात यावर्षी एकूण ३८ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा इमारतींवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मिरा भाईंदर शहरातील ३० वर्षे जुन्या अथवा मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत दरवर्षी सर्वेक्षण केले जाते.

तसेच जुन्या इमारतींना नोटिसा बजावून संरचनात्मक परीक्षण करून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार यावर्षी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात २८ इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. याशिवाय ३६ इमारती रिकाम्या करून दुरुस्ती करण्याची गरज असून, ३४४ इमारतींना दुरुस्तीची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

यामुळे अशा इमारतींच्या धारकांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. तसेच इमारतींच्या संरचनात्मक परीक्षणासाठी पालिकेने बांधकाम अभियंत्यांचे पॅनेल नियुक्त केले आहे. या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार असून, याचा नियमित आढावा पालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सी-१ (अतिधोकादायक इमारती) :- ३८
सी-२ (इमारतींची दुरुस्ती शक्य) :- ३६
सी-२ बी (इमारत रिकामी न करता दुरुस्ती) :- ३४४
सी-३ (इमारतींची किरकोळ दुरुस्ती) :- ३६

न्यायालयीन अडथळे :-

सी-१ प्रकारातील धोकादायक इमारती वेळेत पाडल्या नाहीत, तर पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इमारती पाडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अनेक इमारतींतील रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार नसल्याने तसेच काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे प्रशासनापुढे कारवाई करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.