भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान-शहरी २.० अंतर्गत ‘स्वच्छ आणि आदर्श शहरांची निर्मिती’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मिरा भाईंदर महापालिकेने केले. या परिषदेत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मिरा भाईंदरमधील कचरा व्यवस्थापनाचे अनुभव आणि भविष्यातील नियोजन मांडले.

या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून सहभागी होण्याचे निमंत्रण मिळालेले आयुक्त राधा बिनोद शर्मा हे एकमेव महापालिका आयुक्त होते. देशातील शहरे स्वच्छ, शाश्वत आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.यावेळी मिरा भाईंदर महापालिकेच्या डिजिटल कचरा व्यवस्थापन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रभावी देखरेख ठेवता येते. महाराष्ट्रातील अन्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही प्रणाली आदर्श ठरत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेशाला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेची रणनीतीही परिषदेत मांडण्यात आली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनावर देखरेख, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया, शाश्वत पायाभूत सुविधा उभारणे, कचऱ्यातून पुनर्वापरयोग्य संसाधने मिळवणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींवर महापालिकेने भर दिला.

शास्त्रीय पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षित स्वच्छता, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच प्रशासकीय क्षमता वाढविणे या विषयांवरही परिषदेत चर्चा करण्यात आली. स्वच्छ, सक्षम आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी विविध शहरांमधील उपयुक्त पद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाण या वेळी करण्यात आली.नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासोबतच नागरिककेंद्री आणि शाश्वत शहराच्या निर्मितीसाठी मिरा भाईंदर महापालिका प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.