भाईंदर: मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर अवघ्या दीड वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दुमजली पुलाच्या दुरुस्तीचे काम एमएमआरडीए प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. यात रस्त्याच्या कडेला असलेले डांबरी आवरण नव्याने उभारले जात आहे.
मिरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मेट्रो मार्गिकेसोबत तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे काशिमीरा ते फाटक रोडपर्यंत सुमारे ५ किलोमीटरचा प्रवास सुसाट होणार आहे. यातील प्लेझंट पार्क ते एस. के. स्टोन हा पहिला पूल ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर तिसऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, तिसरा पूल सुरू होण्यापूर्वीच पहिल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रामुख्याने पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर लगेचच त्यावर खड्डे पडल्याचे समोर आले होते. याशिवाय रस्त्यावर असलेला सिमेंट-डांबरीकरणाचा थरही निघू लागला होता. याबाबत प्रवाशांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. तक्रारदार कृष्णा गुप्ता यांनी कंत्राटदारामार्फत रस्त्याची पुनर्बांधणी करून घेण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या प्रकरणी सुनावणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पुलावरील रस्त्याच्या कडेला असलेले तीन फूटपर्यंतचे क्षेत्र खोदून त्याचे आधुनिक पद्धतीने डांबरीकरण करण्याचे आदेश एमएमआरडीए प्राधिकरणाने कंत्राटदाराला दिले. त्यानुसार या कामास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.परंतु अवघ्या दीड वर्षात नव्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे एमएमआरडीए प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली होणाऱ्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्ता एकसमान करण्याची मागणी
मिरा-भाईंदर शहरात उभारण्यात येणाऱ्या पुलांमुळे वाहतूक बऱ्यापैकी सुसाट झाली आहे. याद्वारे अनेक प्रवासी अवघ्या काही मिनिटांत काशिमीरा ते दीपक हॉस्पिटलपर्यंत पोहोचू लागले आहेत. परंतु वाहतूक जलद झाली असली तरी पुलावरील रस्ता एकसमान नसून ओबडधोबड असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. यामुळे भविष्यात दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची भीती असून हा संपूर्ण रस्ताही दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी प्रवासी करू लागले आहेत.
