भाईंदर : आगामी मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी मिरा रोड येथील अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. या सोडतीत काही प्रभाग महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने अनेक माजी नगरसेवकांचे गणित बिघडले आहे. मिरा भाईंदर शहरात एकूण २४ प्रभाग असून, ९५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यापैकी २३ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार आणि एका प्रभागात तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. या ९५ जागांपैकी ४ अनुसूचित जातींसाठी, १ अनुसूचित जमातीसाठी, २५ मागासवर्गीय प्रवर्गासाठी, तर उर्वरित ६५ जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहेत. एकूण जागांपैकी ५० टक्के, म्हणजेच ४८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या ४८ महिला आरक्षणात १३ जागा मागासवर्गीय गटातून, २ जागा अनुसूचित जाती-जमाती गटातून आणि ३३ जागा खुल्या गटातून निवडल्या जाणार आहेत. सोडतीनंतर यंदा प्रभाग क्रमांक ११, १३, १४ आणि १८ हे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तर प्रभाग क्रमांक १४-ब ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आली आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ६, ८, २०, २१ आणि २३ या जागा मागासवर्गीय महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे.

हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत :

मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षणाबाबत नागरिकांना हरकती किंवा सूचना नोंदविण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीची मुदत देण्यात आली आहे.ही हरकत भाईंदर पश्चिम येथील महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक कार्यलयात नोंदवता येणार आहे.यानंतर संबंधित हरकतींची सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग जागेचे आरक्षण निश्चित करण्यात येईल.

मोठे फेरबदल :

मिरा भाईंदर महापालिकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग जागेच्या आरक्षणात २०१७ च्या तुलनेत मोठे फेरबदल झाले आहे.प्रभाग क्रमांक ११ मधील अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी आरक्षित असलेली जागा यंदा महिला वर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत शिर्के यांची अडचण निर्माण झाली आहे.प्रभाग क्रमांक १२ मधील दोन जागा खुल्या पुरुष वर्गासाठी होत्या. त्यापैकी एक जागा आता मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक अरविंद शेट्टी यांना देखील फटका बसणार आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये देखील एक जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्याने भाजपचे माजी नगरसेवक संजय थेरडे यांना अडचण येऊ शकते. तसेच प्रभाग क्रमांक १९ येथील जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव झाल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक ओमप्रकाश मेहरा किंवा अनिल सावंत यांचीही अडचण निर्माण होणार आहे