भाईंदर : महिलांना रोजगाराची संधी देणारा आणि नीती आयोगाकडून गौरव झालेला मिरा-भाईंदर महापालिकेचा ‘फराळ सखी’ उपक्रम यंदा दिवाळीतच बंद पडला आहे. महापालिका आणि महिला बचत गटांमधील विसंवादाचा फटका या उपक्रमाला बसल्याचे समोर आले आहे.

मिरा भाईंदर मधील महिलांना कायमस्वरूपी रोजगार आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेने ‘फराळ सखी’ उपक्रम सुरू केला होता. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत महिलांनी सुमारे तीन टन फराळाची विक्री केली होती. या उपक्रमाची दखल केंद्र सरकारच्या नीती आयोगाने घेतली होती. त्यानंतर निवडक महिला उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच या उपक्रमाला देशभरात प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेची ज्ञान भागीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या यशानंतर ‘फराळ सखी’ला ब्रँड म्हणून विकसित करून दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध खाद्यपदार्थांची विक्री करण्याची योजना प्रशासनाने आखली होती.यासाठी मिरा रोड येथील परिवहन डेपोच्या इमारती मध्ये किचन देखील उभारण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात या उपक्रमाला अपेक्षित सातत्य राखता आले नाही. बाजारपेठेत आधीपासूनच विविध प्रकारचे फराळ आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असल्याने स्पर्धा वाढली होती. त्यामुळे फराळ सखीच्या पदार्थांना अपेक्षित प्रतिसाद मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यातच ऑनलाइन आणि डिजिटल माध्यमातून विक्रीचे पर्याय प्रभावीपणे वापरले गेले नाहीत.परिणामी विक्री आणि उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत.

महिलांना अपेक्षित आर्थिक फायदा होत नसल्याने यंदा उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिला पुढे आल्या नाहीत.दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, महिला बचत गटांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने उपक्रम पुढे नेता आला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परिणामी देशपातळीवर चर्चेत आलेला हा उपक्रम यंदा दिवाळीतच बंद पडला आहे.

“फराळी सखी उपक्रम हा यशस्वी उपक्रम आहे. मात्र यंदा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करून देखील यात अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही. तसेच बाजारातील स्पर्धेचा यावर मोठा परिणाम झाला आहे.”- राधा बिनोद शर्मा – आयुक्त ( मिरा भाईंदर महानगरपालिका )