भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर उभारण्यात आलेल्या नव्या दुसऱ्या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. त्यात उड्डाणपूल उतरतानाच यू-टर्न असल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.मिरा भाईंदर शहरात मेट्रो उभारणीचे काम सुरू आहे.
मेट्रोसोबतच खालील रस्ते सुसाट व्हावेत, या उद्देशाने काशिमीरा ते फाटक रोडदरम्यान तीन उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यातील प्लेझंट पार्क ते एस. के. स्टोन आणि एस. के. स्टोन ते शिवार गार्डन दरम्यानचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर शिवार गार्डन ते फाटक रोडदरम्यानच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मात्र हा पूल सुरू न झाल्यामुळे शिवार गार्डन परिसरातील पुलावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे. गर्दीच्या वेळेत तसेच सुट्टीच्या दिवशी येथे वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे. त्यात पूल उतारातच रस्त्याच्या मध्यभागी यू-टर्नसाठी वळण दिल्यामुळे वाहने थांबत आहेत.
परिणामी कोंडीत अधिक भर पडत असून, रस्ते सुसाट करण्यासाठी उभारलेले पूलच आता वाहतूक कोंडीच्या जाळ्यात अडकले असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत.दरम्यान, येत्या काही दिवसांत शेवटचा उड्डाण पूल सुरू होणार असून त्यामुळे ही समस्या मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यंत्रणा उभारण्याची मागणी
शिवार गार्डन मार्गावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी येथे कर्मचारी व मदतनीस तैनात केले आहेत. मात्र तरीही समस्या सुटत नसल्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

