भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील बाजारपेठांमध्ये मागील काही दिवसांपासून फळांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कलिंगड, पपई, खरबूज आणि द्राक्षांनी किलोमागे शंभरीचा टप्पा गाठण्यास सुरुवात केली आहे.
जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या काळात मोठ्या संख्येने नागरिक रोजा (उपवास) पाळले जात आहेत. सायंकाळी रोजा सोडताना प्रामुख्याने फळांपासून सुरुवात केली जाते. त्यामुळे कलिंगड, पपई, खरबूज, द्राक्ष, खजूर आदी फळांना विशेष मागणी असते. तसेच अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात असल्याने या फळांची मागणी आणखी वाढते.
घाऊक बाजारात या फळांचे दर अद्याप स्थिर असल्याचे सांगितले जात असले तरी किरकोळ बाजारात मात्र दुप्पट दर आकारले जात असल्याची बाब समोर आली आहे. पूर्वी काही फळे नगाप्रमाणे विकली जात होती; मात्र आता ती किलोप्रमाणे विक्रीस ठेवली जात आहेत. रमजान सुरू होण्यापूर्वी आणि सध्या असलेल्या दरात अवघ्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घाऊक बाजारात दर स्थिर असताना किरकोळ विक्रेत्यांकडून रमजानचे कारण पुढे करून फळे महाग विकली जात असल्याची तक्रार काही प्रामाणिक फळ विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
किरकोळ बाजारात फळाचे दर
फळ आधीचे दर आता
कलिंगड ४० प्रति किलो ८०-९० प्रति किलो
पपई ३० प्रति किलो ५० प्रति किलो
खरबूज ५० प्रति २ किलो ९० रुपये प्रति २किलो
द्राक्ष १०० प्रति किलो १६० प्रति किलो
