वसई: मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे उल्लंघन करत, गणेशोत्सवादरम्यान कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती पुन्हा खाडी पात्रात टाकल्या जात असल्याचा प्रकार मिरा – भाईंदर शहरात शुक्रवारी घडला. याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर काशिगाव पोलीस ठाण्यात पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करत यंदा शहरातील अनेक भाविकांनी ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या शाडूच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कृत्रीम तलावात विसर्जित केल्या. मात्र, रेतीबंदर, घोडबंदर गाव येथे विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा खाडी पात्रात टाकल्या जात असल्याची चित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे मिरा-भाईंदर महापालिकेचा गणवेश परिधान केलेल्या दोन व्यक्ती गणपतीच्या मूर्ती खाडीपात्रात टाकताना या चित्रफितीत दिसत आहेत.

त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी व त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

नागरिकांच्या तक्रारीनंतर काशिगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात विसर्जन ठिकाणावरील कृत्रीम तलावातील पाणी काढून घेतल्यानंतर खाली राहिलेल्या ३ ते ४ मूर्ती संकलन केंद्रात न ठेवता खाडीमध्ये टाकुन महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे उल्लघन केल्याप्रकरणी व लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील या उद्देशाने कृत्य केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २३३, २९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

कृत्रिम तलाव उभारणीवर प्रश्नचिन्ह

कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा खाडीत टाकल्या जात असतील, तर कृत्रिम तलाव उभारण्याचा उद्देश, त्यासाठी केलेला खर्च व मूर्तीच्या पुढील विल्हेवाटीची अधिकृत प्रक्रिया याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिली आहे. तसेच मूर्तीसह थर्माकॉल, सजावटीचे साहित्य व निर्माल्य पाण्यात तरंगताना दिसत आहे. यामुळे पाण्याचे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संबंधित ठिकाणच्या पाण्याची नमुने घेऊन त्याची चाचणी केली जावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

खाडीपात्राच्या परिसरात पडदे लावण्याचा प्रकार

कृत्रिम तलावातील गणेश मूर्ती खाडीपत्रात टाकल्या जात असल्याचे चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर, त्या ठिकाणी पांढरे पडदे लावण्यात आला असल्याचा दावा, स्थानिक नागरिकांनी केला आहे.