भाईंदर : गणेशोत्सवात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने यंदा शहरात २४ विसर्जन स्थळे सज्ज केली आहेत. यामध्ये पाच नैसर्गिक जलस्रोत आणि १९ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सहा फुटांपेक्षा मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये, तर सहा फुटांखालील मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर शहरात दरवर्षी सुमारे १२ हजार घरगुती गणेशमूर्ती, तर जवळपास ४०० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या सर्व मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. भाविकांना आपल्या परिसरातून जवळच्या विसर्जनस्थळी मूर्ती नेता यावी आणि विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडीकिनारा, भाईंदर पूर्व खाडीकिनारा, घोडबंदर रेतीबंदर खाडीकिनारा आणि चेना नदी ही पाच नैसर्गिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय आठ मैदानांवर तात्पुरते कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.
भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, एसटीची मोकळी जागा, भाईंदर पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे मैदान, मेजर ध्यानचंद मैदान, जेसलपार्क चौपाटी विधी शेडजवळील मैदान, बालाजी मैदान, मीरा रोड येथील डॉन बॉस्को शाळेसमोरील मैदान आणि शिवार गार्डन येथे ही व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वर्षी मुर्धा गावात नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन केल्याप्रकरणी काही गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यंदा मुर्धा गावातील नैसर्गिक तलावातच स्वतंत्र कप्पा तयार करून विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नियमांचे पालन करून त्याच ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.
मोर्वा गावातील पाटील मैदान परिसर, राई गावातील राममंदिर तलाव, भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन तलाव, भाईंदर पूर्वेकडील जुना नवघर तलाव, एस. एन. कॉलेजसमोरील तलाव परिसर, मीरा रोड येथील शिवार गार्डन परिसर, घोडबंदर येथील पद्मावती तलाव व नासका तलाव, काशिमीरा येथील जरीमरी तलाव, मिरागाव येथील सातकरी तलाव आणि पेणकरपाडा येथील सुकाळा तलाव या ११ तलावांमध्ये स्वतंत्र कप्पे तयार करून कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे.
पोलीस बंदोबस्त :-
मागील वर्षी शहरात एकूण १९ हजार १६७ गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन झाले होते. यंदा विसर्जनाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तयारी केली आहे. विसर्जनादरम्यान शून्य अपघाताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, भाविकांना थेट पाण्यात उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन पालिकेच्या प्रशिक्षित विसर्जन पथकांमार्फतच करण्यात येणार आहे.कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विसर्जनस्थळांवर पोलिसांची विविध पथके तैनात राहणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत यासाठी सर्व विसर्जनस्थळांवर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. पालिकेच्या या नियोजनामुळे गणेशभक्तांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देता येणार आहे.
