भाईंदर : मिरा भाईंदर शहरात गणेशोत्सवाच्या काळात मंडपस्थळी अनधिकृत जाहिराती लावण्यास प्रशासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ताकीद प्रशासनाने दिली आहे.
मिरा भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. शहरात जवळपास दोनशेहून अधिक नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तसेच घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, हा आकडा आता दहा हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव हे शिस्तबद्धपणे आणि नियमांच्या चौकटीत पार पडावेत, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांच्या उपस्थितीत जाहीर बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीस शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यावेळी मंडपांसाठी प्रशासनाने आखलेले धोरण, डीजेवरील निर्बंध, विसर्जनाची व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. याशिवाय महापालिकेने निश्चित केलेल्या अनधिकृत जाहिरातबाजीविरोधातील धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वी गणेशोत्सव मंडळांना मंडपस्थळी मर्यादित स्वरूपात जाहिरात लावण्याची मुभा दिली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी नियम डावलून मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक उभारण्यात येत असल्यामुळे आता जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मात्र, उत्सवाच्या काळात जाहिरातींना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनेक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“सार्वजनिक गणेशोत्सव हा प्रामुख्याने देणगीदारांच्या मदतीने साजरा केला जातो. त्यामुळे अशा देणगीदारांची जाहिरात करणे मंडळांना भाग पडते. मात्र, पालिकेने धोरण निश्चित केल्यामुळे अशा जाहिराती लावणे कठीण होत आहे. त्यामुळे वर्षभर ज्या नियमांचे पालन केले जाते, त्याला सार्वजनिक उत्सवाच्या काळात मुभा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.”-प्रसाद सुर्वे -अध्यक्ष ( मिरा भाईंदर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती)
