भाईंदर : मिरा भाईंदर शहरात गणेशोत्सवासाठी थेट रस्ता अडवून मंडप उभारले जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने मंडप उभारणीसाठी घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
मिरा भाईंदर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरात दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा महापालिकेने मंडप परवानगी प्रक्रियेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांत कोणतीही तक्रार अथवा नियमभंगाची नोंद नसलेल्या मंडळांना पाच वर्षांची मंडप परवानगी देण्यात येणार आहे.मात्र, मंडप उभारताना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंडपाची रुंदी रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एकचतुर्थांशपेक्षा अधिक नसावी. सार्वजनिक वाहतूक मार्गावर वाहनांच्या वाहतुकीसाठी किमान १२ फूट जागा मोकळी ठेवणे आवश्यक आहे. आठ फूट किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच विद्युत तार आणि डीपी बॉक्सपासून किमान सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक असून, काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर खोदकाम करण्यासही बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.
मात्र, प्रत्यक्षात शहरातील अनेक मंडळांकडून या नियमांना हरताळ फासून मंडप उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. अरुंद रस्त्यांवर मोठे मंडप उभारल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, त्याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि शालेय बसला बसत असल्याची तक्रार आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या मंडपांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन झालेल्या मंडपांची पाहणी करून आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
समितीचे दुर्लक्ष?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मंडपांची पाहणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. विनापरवानगी किंवा नियमांचे उल्लंघन करून उभारलेले मंडप तातडीने हटवून संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शहरातील बहुतांश मंडप उभारल्यानंतरही समितीकडून त्यांची पाहणी किंवा कारवाई होत नसल्याची तक्रार केली जात आहे.
