भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिकेच्या एकमेव गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.भाईंदर येथे महापालिकेचे गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल आहे. काही महिन्यांपूर्वी या संकुलात नऊ वर्षीय ग्रंथ मूथा या मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू झाला होता.
क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा अहवाल प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीमार्फत देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेनंतर क्रीडा संकुल काही काळ बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी क्रीडा विभागाला दिले होते.
त्यानुसार, मागील जवळपास नऊ महिन्यापासून हे संकुल बंद राहिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील सदस्यांकडून आता केली जात आहे.मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे, संकुल सुरू केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे अजून काही काळ संकुल बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने नवी युक्ती वापरली आहे.
त्यानुसार संकुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे काम शासन निधीतून करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत.त्यावरून शासनाने देखील यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला असून हे काम हाती घेण्यात आले आहेत. संकुलात काही बदल करून नव्याने साहित्याची उभारणी करण्याच्या दुष्टीने हे काम सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांनी दिली आहे.
सदस्यांची फसवणूक?
मिरा भाईंदर महापालिकेचे क्रीडा संकुल प्रशासनाने कंत्राट दाराला चालवण्यास दिले होते. त्यामुळे कंत्राट दाराने विविध सवलती देऊन जवळपास चार हजाराहून अधिक सदस्य यात जोडले होते. यासाठी निश्चित शुल्क आकारणी देखील करण्यात आली होती. दरम्यान तरण तलावात झालेल्या दुर्घटनेनंतर हे संकुल बंद ठेवण्यात आले आहेत.मात्र हजारो सदस्यांनी जमा केलेल्या पैश्याबाबत प्रशासन तसेच कंत्राट दार ठोस उत्तर देत नसल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याची भावना सदस्यामध्ये निर्माण होऊ लागली आहे

