भाईंदर : मागील वर्षभरापासून बंद ठेवण्यात आलेले महापालिकेचे क्रीडा संकुल अखेर येत्या काही दिवसांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात जुन्या खेळांच्या सुविधांसह पिकल बॉल आणि फुटबॉल या खेळांची नव्याने भर टाकण्यात आली आहे.

भाईंदर येथे महापालिकेचे गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल आहे. मागील वर्षी या संकुलात नऊ वर्षीय ग्रंथ मूथा या मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा अहवाल प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीमार्फत देण्यात आला होता. याशिवाय या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर तेव्हापासून क्रीडा संकुल बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी क्रीडा विभागाला दिले होते.

त्यानुसार, मागील वर्षभरापासून हे संकुल बंद राहिल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील सदस्यांकडून केली जात होती. त्यावरून काही महिन्यांपूर्वी क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, आता क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसह प्रांगणात तरण तलाव, बास्केटबॉलसह आता नव्याने प्रचलित झालेल्या पिकल बॉल आणि फुटबॉल खेळाची भर टाकण्यात आली आहे. सध्या या कामाची तपासणी सुरू असून लवकरच संकुल सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जुन्या सदस्यांना दिलासा :-

महापालिकेचे क्रीडा संकुल मागील वर्षभरापासून बंद होते. त्यामुळे पैसे भरून सदस्यता घेतलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, आता क्रीडा संकुल सुरू करताना जुन्या सदस्यांची सदस्यता ग्राह्य धरून त्यांना जितके दिवस किंवा महिने वाया गेले, तितक्या कालावधीसाठी क्रीडा संकुलाचा वापर करता येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मात्र कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत :-

मागील वर्षी या संकुलात नऊ वर्षीय ग्रंथ मूथा या मुलाचा तरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा अहवाल प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीमार्फत देण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने क्रीडा संकुलाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणात कंत्राटदारासोबत सहकार्य करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या भाजप पक्षातील लोकप्रतिनिधींना यातून वगळण्यात आले. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मागील वर्षभरापासून ग्रंथचे कुटुंबीय लढत असून अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.