भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील फेरीवाला समितीची निवडणूक होऊन दहा महिने उलटले तरी समिती अद्याप कार्यान्वित झालेली नाही. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अधिसूचना न झाल्यामुळे ही समिती केवळ कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे. मिरा भाईंदर शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ लागू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार ३० मे २०२५ रोजी समितीच्या निवडणुका पार पडल्या. याआधी विविध प्रवर्गांतील प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आरक्षण आणि सोडत प्रक्रिया राबवण्यात आली होती. महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत सर्वेक्षण करून ८ हजार ५२८ नोंदणीकृत पथविक्रेत्यांची अंतिम यादी तयार केली होती. या यादीतून प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊनही शासनाकडून समितीला अधिसूचित करण्यात आलेले नाही.

समिती कार्यान्वित नसल्याने फेरीवाल्यांना कोणतेही अधिकृत प्रतिनिधित्व मिळत नसून अतिक्रमण कारवाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आझाद हॉकर्स युनियनने महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत अतिक्रमण विभागाला योग्य निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच पालिका अधिकारी, पोलीस आणि फेरीवाला प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कारवाई सुरूच :-

मिरा भाईंदर शहरात ना फेरीवाला क्षेत्रात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई सतत केली जात आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी असलेले रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत होत असल्याचे दिसून आले आहे.