भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दैनंदिन शुल्क आकारणीत कपात करण्याचा प्रस्ताव आज (बुधवारी) होणाऱ्या महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे फेरीवाल्यांचे लक्ष लागले आहे. मिरा भाईंदर शहरात बहुतांश भागात रस्त्याच्या कडेला फेरीवाले उभे असतात. अशा या फेरीवाल्यांवर महापालिकेकडून शुल्क आकारणी केली जाते.

यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानुसार कंत्राटदारामार्फत ही वसुली केली जाते. यापूर्वी दोन चौ.मी. जागेसाठी ५९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त जागेसाठी ८९ रुपये असे शुल्क आकारले जात होते.मात्र ऑगस्ट २०२३ मध्ये पालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या उद्देशाने या शुल्कात सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढ केली. त्यानुसार दोन चौ.मी. जागेसाठी ८९ रुपये, तर अधिक जागेसाठी ११८ रुपये (जीएसटीसह) आकारले जात आहेत.

या वाढीमुळे पालिकेच्या उत्पन्नात वार्षिक सुमारे दोन कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र ही वाढीव शुल्क परवडत नसल्याची तक्रार फेरीवाल्यांकडून सातत्याने केली जात होती.या शुल्कात कपात करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार सत्ताधारी पक्षाकडून या शुल्क कपातीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो महासभेपुढे सादर केला जाणार आहे.

महापौर डिंपल मेहता यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.दरम्यान, महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत ताणलेली असून उत्पन्नवाढीची गरज अधोरेखित केली जात आहे. अशा परिस्थितीत महसुलावर परिणाम होईल का, आणि महासभा कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच:-

मिरा भाईंदर शहरात अनधिकृत पणे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील आठवडा भरापासून प्रशासनाने तयार केलेले हे पथक फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. यात फेरीवाले पुन्हा रस्त्यावर बसू नये म्हणून त्याच्या हातगाड्या तोडण्यात येत आहेत.