भाईंदर :-मिरा-भाईंदर शहरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुमारे २० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून ती हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांच्या कडेला महापालिकेने विविध प्रकारची झाडे लावली आहेत. यापैकी काही झाडे महापालिकेच्या स्थापनेपूर्वीची असून काही खासगी मालकीची आहेत. पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील झाडांचे नियमित सर्वेक्षण करून धोकादायक झाडे हटविणे तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, ही जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. यासंदर्भातील आदेश उद्यान विभागाला प्रशासनाकडून दिले जातात.
मात्र, यंदा शहरातील झाडांच्या सर्वेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाला सुरुवात होताच अवघ्या तीन दिवसांत सुमारे २० झाडे रस्त्यावर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, ही झाडे प्रामुख्याने नागरी वर्दळ असलेल्या ठिकाणी कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसळलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने हटविली असली, तरी अन्य धोकादायक झाडे केव्हा कोसळतील, याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. त्यामुळे प्रशासनाने धोकादायक झाडांचे पुन्हा सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आली आहे.
एक जण गंभीर जखमी
भाईंदर पश्चिम येथील राई गाव परिसरात बुधवारी सायंकाळी एका खासगी मालकीच्या नारळाच्या झाडाचा बुंधा अचानक कोसळून तो एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
