भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरात गेल्या २४ तासांत १९० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील ४३ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली असून अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मागील तीन दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे आणि भरतीच्या काळात सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली असून काही मार्ग तात्पुरते बंद ठेवावे लागले. पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्याही अधिक तीव्र झाली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपर्यंत शहरात १९० मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस अतिवृष्टीच्या श्रेणीत मोडत असल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. मात्र, सखल भागांत महापालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप सुरू केल्याने परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले.

दरम्यान, मुसळधार पावसाबरोबरच सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या २४ तासांत शहरात ४३ ठिकाणी झाडे कोसळली. या घटनांमध्ये एका महिलेला किरकोळ दुखापत झाली असून इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अद्यापही धोकादायक अवस्थेतील झाडांबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी येत आहेत. त्यामुळे उद्यान विभाग आणि अग्निशमन विभागाची पथके शहरातील विविध भागांत पाहणी करून झाडांच्या फांद्या छाटणे, पडलेली झाडे हटविणे आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

नाल्यांमधून पाण्याचा निचरा रखडला

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक अंतर्गत नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि नालेसफाई कंत्राटदार प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून नाल्यांची साफसफाई करून घेत आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी तात्पुरते नाले खोदण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.