मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदर शहराने गेल्या दशकात विकासाची मोठी झेप घेतली आहे. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात या शहराला सोन्याचे मोल प्राप्त झाले असून, गगनचुंबी इमारती आणि टोलेजंग प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, या चकाकीच्या मागे एक भयानक वास्तव दडलेले आहे. शहरात ठिकठिकाणी मोकळ्या भूखंडांवर पसरलेले अनधिकृत बांधकामांचे जाळे आता शहरासाठी जीवघेणे ठरू लागले आहे.
गेल्या काही महिन्यांत लागलेल्या आगीच्या भीषण घटनांनी हे स्पष्ट केले आहे की, मिरा-भाईंदर सध्या एका ‘विस्फोटक’ वळणावर उभे आहे. हा प्रश्न केवळ प्रशासकीय ढिसाळपणाचा नसून, तो हजारो नागरिकांच्या जीवाशी निगडित आहे.
शहरातील मोकळ्या भूखंडांवर कब्जा मिळवण्यासाठी किंवा रिकाम्या जागेतून झटपट आर्थिक लाभ मिळवण्यासाठी विकासक आणि जमीन मालकांनी एक नवीन शक्कल लढवली आहे. या भूखंडांवर ताडपत्री, बांबू आणि पत्र्यांच्या साहाय्याने तात्पुरती शेड उभारली जात आहेत. ही बांधकामे दिसायला जरी ‘तात्पुरती’ असली, तरी त्यातून चालणारे व्यवहार मात्र कायमस्वरूपी आणि मोठे आहेत. यात फर्निचरचे मोठे गाळे, धोकादायक रसायनांची गोदामे, हॉटेल, गॅरेज आणि लघु उद्योग थाटले गेले आहेत.
केवळ व्यावसायिकच नव्हे, तर मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या नजीक मजुरांसाठी कोणत्याही सोयीसुविधांशिवाय असुरक्षित झोपड्यांची निर्मिती केली जात आहे. ही बांधकामे करताना ना महापालिकेची परवानगी घेतली जाते, ना अग्निशमन दलाचे नियम पाळले जातात.
नुकताच एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत मिरा-भाईंदरने आगीचे रौद्र रूप अनुभवले. शहरात पाच मोठ्या आगीच्या घटना घडल्या. यामध्ये सर्वात हृदयद्रावक घटना भाईंदरमधील एका झोपडपट्टी परिसरात घडली, जिथे दोन निष्पाप शाळकरी मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मिरारोड येथील आगीने तर एका गोदामाला कवेत घेता घेता शेजारील रहिवासी इमारतीतील ३० कुटुंबांचे आयुष्य धोक्यात आणले होते. या आगींचे मुख्य कारण ‘शॉर्टसर्किट’ असल्याचे सांगितले जाते. अनधिकृत वीज जोडण्या आणि वीजतारांचे उघड्यावर असलेले जाळे यामुळे ठिणगी पडताच संपूर्ण परिसर भस्मसात होतो. ताडपत्री आणि बांबू यांसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीचा प्रसार इतका वेगाने होतो की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सर्वकाही खाक झालेले असते.
विशेषतः शहरात कोणतीही मोठी दुर्घटना घडली की प्रशासन खडबडून जागे होते. या आगीच्या दुर्घटनेनंतर समाजमाध्यमांवर तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. वाढता दबाव लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ताडपत्री आणि बांबूच्या शेड हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरुवातीला काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली; मात्र संबंधित भूखंडांना राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चेमुळे ही मोहीम काही दिवसांतच थंडावल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाढत्या आगीच्या घटनेनंतर नागरिकांची प्रमुख मागणी आहे की, जर प्रशासन ही बांधकामे पाडू शकत नसेल, तर किमान तिथे ‘फायर ऑडिट’ अनिवार्य करावे. प्रत्येक गाळ्यात अग्निशमन उपकरणे, पाण्याचे स्त्रोत आणि आपत्कालीन मार्ग असणे आवश्यक आहे. मात्र, प्राथमिक उपाययोजनांशिवाय सुरू असलेले हे व्यवसाय आता मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत. केवळ यंत्रणा बसवून भागणार नाही, तर त्यांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यायला हवी.
वेळीच सावध होण्याची गरज
आगीच्या दुर्घटनेनंतर मिरा-भाईंदर शहर हे सध्या एका ज्वालामुखीवर आहे असेच म्हणावे लागेल. जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन विचार केला नाही, तर भविष्यात यापेक्षाही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीच्या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत आणि त्या रोखण्यासाठी ‘इच्छाशक्ती’ची गरज आहे. केवळ कागदावर नियम बनवून किंवा तात्पुरते तोडकाम करून हा प्रश्न सुटणार नाही. शहराला आगीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर सातत्यपूर्ण आणि भेदभावविरहित कारवाई होणे, हीच काळाची गरज आहे. अन्यथा शहर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अनधिकृत बांधकामांच्या संरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र?
मिरा-भाईंदर शहरातील मोकळ्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्यानंतर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील ताडपत्री आणि बांबूच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग स्तरावर काही ठिकाणी कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, या कारवाईमुळे व्यावसायिकांसह काही राजकीय पदाधिकाऱ्यांनाही फटका बसल्याची चर्चा आहे. अनेक अनधिकृत बांधकामांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाची कारवाई शिथिल करण्यासाठी मोकळ्या भूखंडांवरील बांधकामांसाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याची मागणी नुकत्याच झालेल्या महासभेत करण्यात आली.
विशेष म्हणजे या प्रस्तावात अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचा उल्लेख नसून केवळ अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येत या प्रस्तावाला समर्थन दिले. त्यामुळे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींनीच अशा बांधकामांना अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याचा आरोप आता मृतांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
