भाईंदर :- मिरा रोड येथे खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत हॉटेलच्या बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे.

मिरा रोड येथील सृष्टी भागात खाडी किनारी कांदळवन नष्ट करून रॉयल गार्डन हॉटेल उभारण्यात आले होते.त्यामुळे याबाबत स्थानिक नागरिकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. तसेच याबाबतची तक्रार स्थानिकांनी महापालिका प्रशासनाकडे दिली होती. परंतु सुरुवातीला प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे काही तक्रारदारांनी याबाबत थेट न्यायालयात खटला दाखल करून दाद मागण्याचा प्रयत्न केला. यात सुनावणी प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयाने सदर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते.

त्यावरून मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण, प्रियंका भोसले आणि जितेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या वेळी प्रभाग समितीतील कर्मचारी, फेरीवाले पथक, पोलीस व महापालिकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने चार ठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्यात आली.

त्यात रॉयल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट अँड बार, जाफर खाडी परिसरातील शेड व कुंपण, पुनम सागर कॉम्प्लेक्समधील पत्र्याचे गोडाऊन आणि स्मशानभूमीमागील बांधकामांचा समावेश आहे.