भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयाचे कामकाज डिजिटल करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. यामध्ये रुग्णांची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जात आहे. त्यामुळे पेपरलेस कारभाराला चालना मिळून कामकाजात अधिक सुसूत्रता येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

मिरा रोड येथे महानगरपालिकेचे एकमेव भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या काही मोजक्या आजारांवर उपचार केले जात असले तरी येथील सुविधांवर भर देण्याकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. मागील काही वर्षांत रुग्णालयाचे मजले वाढवणे, वैद्यकीय उपकरणे बसवणे तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे. त्यात आता रुग्णालयाचे कामकाज डिजिटल करण्याचा निर्णयही पालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.

प्रामुख्याने महापालिकेने रुग्णालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी एका डिजिटल सॉफ्टवेअरची उभारणी केली आहे. या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंद केली जात आहे. यात रुग्णाचा केस पेपर तयार करणे, औषधांची नोंद करणे, देण्यात आलेल्या उपचारांची माहिती नोंदवणे आदी बाबींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, रुग्णांचा मोबाईल क्रमांक हा त्यांचा युनिक आयडी क्रमांक म्हणून वापरला जाणार आहे. तसेच कुटुंब प्रमुखाला आपल्या मोबाईल क्रमांकावर पाच जणांचे आयडी तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे.यामुळे रुग्णालयात पेपरलेस कारभार सुरू झाला असून पारदर्शकतेतही मोठी भर पडली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवली जात असल्याने ज्यांना कागदी प्रतीची आवश्यकता आहे, त्यांनाच पेपर दिले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.

आरोग्य केंद्रेही होणार डिजिटल

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या रुग्णालयात राबवण्यात येणाऱ्या डिजिटल प्रणालीला यश मिळाल्यास, शहरातील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्येही तिची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी सतत फाईल घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. तसेच डॉक्टरांनाही डिजिटल नोंदणीमुळे रुग्णांवर अधिक योग्य उपचार करणे शक्य होणार असल्याची माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.