भाईंदर : मिरा-भाईंदर परिसरातील स्टील उद्योगांना भेडसावणाऱ्या पाणी साचणे आणि बांधकामविषयक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कारखाना शेडची उंची वाढविण्यास नियमानुसार बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मिरा-भाईंदर परिसरातील अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण आणि नव्याने बांधकाम झाल्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या तुलनेत अनेक कारखाने आणि औद्योगिक भूखंड सखल झाले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने उत्पादनावर परिणाम होऊन उद्योजकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. रस्त्याची विद्यमान उंची, परिसराची भौगोलिक परिस्थिती आणि अग्निसुरक्षेचे निकष विचारात घेऊन, विद्यमान जागेवरच कारखाना शेडची उंची वाढविण्यासाठी आवश्यक बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यासाठी नगरविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी मिरा-भाईंदरसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा. या प्रस्तावाची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करून नागरिक आणि उद्योजकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात. त्यानंतर प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही सरनाईक यांनी दिल्या.या बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, ठाणे जिल्ह्याच्या उद्योग उपायुक्त सोनाली देवरे तसेच स्टील उद्योजक संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.