भाईंदर :- काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या दुरुस्ती व स्थलांतरणाचा प्रस्ताव मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी महासभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे.
मिरा-भाईंदर मुख्य मार्गावरील काशिमीरा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मागील काही वर्षांपासून मेट्रोच्या कामांमुळे हा पुतळा झाकला गेला असून नागरिकांना तो व्यवस्थित दिसत नाही. दरम्यान, पुतळ्याची दुरुस्ती करून त्याचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
मराठी एकीकरण समितीच्या वतीने पुतळा स्थलांतरित न करता त्याच ठिकाणी थोडा पुढे सरकवून उंच चौथऱ्यावर बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. समितीच्या मते, ऐतिहासिक व प्रेरणादायी असलेल्या या स्मारकाचे जतन आणि योग्य दर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे.
या संदर्भात एमएमआरडीए व जे. कुमार यांनी पूर्वी दिलेल्या कबुली नुसार स्मारक परिसराचे सुशोभीकरण व उद्यान विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या अनुषंगाने, पुतळ्याची दुरुस्ती झाल्यानंतर तो स्थलांतरित न करता तीनही पुलांवरून स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने त्याचे स्थान निश्चित करावे, तसेच त्याची उंची वाढवावी, स्मारकाभोवती स्वच्छता व सुशोभीकरण करून आकर्षक ऐतिहासिक देखावा निर्माण करावा आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींसह ऐतिहासिक घटकांचा समावेश करून परिसर अधिक प्रभावी करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महासभेत मांडल्या जाणाऱ्या या प्रस्तावावरून शहरात चर्चा रंगली असून प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
